Pune Crime: राज्याच्या सत्ताकेंद्रातील बड्या पदांचा वापर करून प्रशासनावर वचक निर्माण करण्याचा प्रयत्न एका भामट्याला चांगलाच महागात पडला आहे. आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील ‘विशेष कार्य अधिकारी’ (OSD) असल्याचे भासवून पुणे पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या एका तोतयाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या धक्कादायक प्रकारामुळे पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
प्राप्त माहितीनुसार, प्रद्युम्न श्रीहरी पाटील (47, रा. हिंजवडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या पठ्ठ्याने थेट पुण्याच्या परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त (DCP) ऋषिकेश रावले यांचे कार्यालय गाठले. तिथे गेल्यावर त्याने आपण मंत्रालयातील ‘OSD’ असल्याचे सांगून रुबाब गाजवण्यास सुरुवात केली. मात्र, त्याच्या संशयास्पद हालचाली आणि बोलण्यातील विसंगतीमुळे पोलिसांना शंका आली.
असा झाला भांडाफोड
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने खातरजमा केली असता, संबंधित व्यक्तीचा मुख्यमंत्री कार्यालयाशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले. मंत्र्यांच्या नावाचा आणि पदाचा गैरवापर करून शासकीय कामात ढवळाढवळ करण्याचा आणि पोलिसांची फसवणूक करण्याचा त्याचा हेतू उघड झाला. यानंतर पुणे पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याला ताब्यात घेतले.
गुन्हा दाखल आणि कारवाई
आरोपी प्रद्युम्न पाटील याच्याविरुद्ध सरकारी अधिकाऱ्यांची दिशाभूल करणे आणि तोतयागिरी करणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंत्रालयातील बड्या पदांचा धाक दाखवून कोणाची फसवणूक करण्याचा त्याचा प्रयत्न होता का? या दिशेने आता हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.


