तुमच्या छातीतील एक लहान अवयव तुमचे दीर्घायुष्य आणि गंभीर आजारांचा धोका दर्शवू शकतो का? एका नवीन अभ्यासात अलीकडेच हे उघड झाले आहे. थायमस आपल्या रोगप्रतिकार प्रणालीमध्ये आणि दीर्घकालीन आरोग्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. थायमसच्या आरोग्याचा थेट संबंध हृदयरोग आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांच्या धोक्याशी असू शकतो.
थायमस हा अवयव आता केवळ एक साधी ग्रंथी राहिलेला नाही, तर तो वृद्धत्व आणि आजारांची शक्यता नियंत्रित करणारा एक महत्त्वपूर्ण घटक म्हणून उदयास येत आहे. थायमस ही छातीच्या वरच्या भागात फुफ्फुसांच्या मध्ये स्थित असलेली एक लहान, दोन भागांची ग्रंथी आहे. तिचे मुख्य कार्य टी-लिम्फोसाइट्स नावाच्या पांढऱ्या रक्त पेशी तयार करणे आहे, ज्या शरीराला संसर्ग आणि आजारांपासून वाचवतात. थायमसचे आरोग्य आणि त्यांच्या आजारांचा धोका यांच्यातील संबंध समजून घेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून २७००० हून अधिक रुग्णांच्या स्कॅन आणि वैद्यकीय नोंदींचे विश्लेषण केले.
निरोगी थायमस ग्रंथी असलेल्या लोकांमध्ये मृत्यूचे प्रमाण अंदाजे १३.४ टक्के होते, तर कमकुवत थायमस ग्रंथी असलेल्या लोकांमध्ये हा धोका २५.५ टक्क्यांनी वाढलेला होता. इतकेच नव्हे तर, कमकुवत थायमस ग्रंथी असलेल्या लोकांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका ५.३ टक्क्यांनी आणि हृदयविकाराचा धोका १६.७ टक्क्यांनी वाढलेला आढळला. वाढत्या वयानुसार थायमस ग्रंथी हळूहळू आकुंचन पावते आणि तिच्या जागी चरबीयुक्त ऊतक (fatty tissue) येते. या बदलामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते.


