Karuna Munde: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचे रणमैदान आता अधिकच रंगतदार झाले आहे. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्याविरोधात करुणा शर्मा-मुंडे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी निवडणूक बिनविरोध होऊ नये, अशी आक्रमक भूमिका घेत त्यांनी थेट पवारांच्या बालेकिल्ल्यात शड्डू ठोकला आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना करुणा मुंडे यांनी प्रस्थापित राजकीय पक्षांवर जोरदार निशाणा साधला. गेल्या 10 दिवसांपासून ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत्या. यावर भाष्य करताना त्या म्हणाल्या, “मोठ्या पक्षांनी धाडस दाखवले नाही, म्हणून मी जनतेसाठी एक ‘सक्षम पर्याय’ म्हणून समोर आली आहे. मतदारांना निवडीचा अधिकार असायला हवा, तरच खरे प्रजातंत्र टिकेल.”
शेतकरी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर रान उठवणार
करुणा मुंडे यांनी आपल्या प्रचाराचे मुख्य अजेंडे स्पष्ट केले असून, त्यात स्थानिक आणि राज्यस्तरीय प्रश्नांचा समावेश केला आहे. “देशात अदानी-अंबानींचे भले केले जात असताना बळीराजाकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. माझा मुख्य उद्देश राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे हाच असेल,” असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, बारामतीमधील 600 महिला कर्मचाऱ्यांना विनाकारण नोकरीवरून काढून टाकल्याचा आरोप करत त्यांनी सरकारच्या खाजगीकरणाच्या धोरणावर कडाडून टीका केली.
दरम्यान, आपल्या विजयाबद्दल विश्वास व्यक्त करताना करुणा मुंडे यांनी बारामतीकरांना भावनिक साद घातली आहे. “मी केवळ एका मतदारसंघासाठी नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील अन्यायाविरुद्ध लढत आहे. सुशिक्षित बेरोजगार आणि सामान्यांच्या पोटावर पाय आणणाऱ्या प्रवृत्तींविरुद्ध हा माझा एल्गार आहे. जनतेने साथ दिली, तर सामान्यांच्या हक्कासाठी मी अहोरात्र काम करेन,” असे त्यांनी नमूद केले. सुनेत्रा पवार यांच्यासमोर आता करुणा मुंडे यांचे हे अपक्ष आव्हान कितपत प्रभाव पाडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


