Sanjay Raut : राज्यात ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांनी पुन्हा जोर धरला असताना, संजय राऊत यांनी या सर्व घडामोडींवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे गटाचे खासदार फोडण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चांदरम्यान त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.
सूत्रांच्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाकरे गटाच्या खासदारांशी संपर्कात असून ठाण्यात गुप्त बैठक झाल्याचीही चर्चा रंगली. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे.
यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, “ऑपरेशन एकदाच होतं. वारंवार ऑपरेशन होत असेल तर ते डेडबॉडीचं असतं.” सध्या सुरू असलेले ‘ऑपरेशन’ हे प्रत्यक्षात देवेंद्र फडणवीस हे शिंदे गटावरच करत असल्याचा टोला त्यांनी लगावला.
तसेच ठाकरे गटाचे सर्व नऊ खासदार एकजूट असल्याचा दावा करत, या प्रकारच्या बातम्या फक्त वातावरण तापवण्यासाठी पेरल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “उद्या माझं किंवा आदित्य ठाकरे यांचं नावही टाकतील,” असे म्हणत त्यांनी या चर्चांना फेटाळले.
दरम्यान, विरोधी पक्षाच्या खासदारांना निधी न देण्यावरूनही राऊत यांनी संताप व्यक्त केला. “सत्ताधाऱ्यांना कोटींचा निधी देता, पण विरोधकांना का नाही? हे तुमच्या बापाच्या खिशातले पैसे आहेत का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
पुढे देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत, त्यांनी राष्ट्रीय राजकारणात मोठी झेप घ्यायची असेल तर संकुचित वृत्ती सोडून सर्वांना समान न्याय द्यावा, असा सल्लाही दिला. अन्यथा त्यांचे राजकीय अस्तित्व केंद्रातील नेतृत्वावरच अवलंबून राहील, असा इशाराही राऊत यांनी दिला.


