Pune Crime: पुण्यातील घोरपडे पेठ परिसरात एका 24 वर्षीय रिक्षाचालकाच्या मृत्यूच्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. या घटनेमागे वैयक्तिक संबंधांमधून निर्माण झालेला वाद आणि कथित मानसिक त्रास कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात आला असून पोलिसांनी एका 32 वर्षीय महिलेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश अशोक हलवाई (वय 24) यांचे रायगड जिल्ह्यातील महाड येथील स्वप्नाली संतोष तावरे (वय 32) यांच्याशी प्रेमसंबंध होते. या संबंधांची माहिती दोन्ही कुटुंबांना मिळाल्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्यानंतर नातेवाईकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दोघांनी पुढे कोणताही संपर्क ठेवू नये, असा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जाते.
तक्रारीनुसार, या निर्णयानंतरही संबंधित महिलेने गणेश यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. तसेच त्यांना विविध प्रकारच्या धमक्या देत मानसिक दबाव आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कथित त्रासामुळे गणेश मानसिक तणावाखाली होते, असा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
दरम्यान, गणेश यांचा त्यांच्या राहत्या घरी मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली. मृत तरुणाची बहीण कोमल नीलेश सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संबंधित महिलेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या प्रकरणातील सर्व बाबींची पडताळणी केली जात असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ताळीकोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


