Wrong HIV Report Case: सोलापूर जिल्ह्याच्या आरोग्य विभागाचा अत्यंत संतापजनक आणि भोंगळ कारभार समोर आला आहे. अकलूज येथील शासकीय केंद्राने एका गर्भवती महिलेला ‘HIV पॉझिटिव्ह’ असल्याचा चुकीचा अहवाल दिल्यामुळे तिचे वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. या एका चुकीच्या कागदामुळे सासरच्या मंडळींनी तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची घरवापसी केली. मात्र, पुढील तपासण्यांमध्ये ती महिला पूर्णपणे निरोगी असल्याचे स्पष्ट झाले असून, सरकारी यंत्रणेच्या एका चुकीने एका महिलेला नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे.
नेमकं प्रकरण काय?
ही घटना 16 ऑगस्ट 2024 रोजी घडली, जेव्हा पीडित महिला अकलूज येथील आयसीटीसी (ICTC) केंद्रात तपासणीसाठी गेली होती. तिथे तिला ‘HIV पॉझिटिव्ह’ असल्याचे सांगण्यात आले. हा अहवाल मिळताच तिच्या संसारात भूकंप झाला; पती आणि सासरच्या लोकांनी तिच्यावर संशय घेऊन तिला घरातून हाकलून दिले. धक्कादायक बाब म्हणजे, या चुकीच्या अहवालाच्या आधारावर तिच्यावर एचआयव्हीचे औषधोपचारही सुरू करण्यात आले, ज्याचा तिच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम झाला.
खाजगी चाचणीत सत्य आले समोर
सरकारी अहवालावर शंका आल्याने पीडितेने सोलापूर येथील एसडीएच (SDH), आयसीटीसी आणि खाजगी हिंदलॅब्समध्ये पुन्हा तपासणी करण्याचा निर्णय घेतला. या तपासणीत वस्तुस्थिती समोर आली: ‘HIV-PCR’ आणि ‘व्हायरल लोड’ या दोन्ही महत्त्वाच्या चाचण्यांमध्ये ‘RNA नॉट डिटेक्टेड’ असा निष्कर्ष आला. म्हणजेच, ती महिला पूर्णपणे निगेटिव्ह असल्याचे सिद्ध झाले. यावरून सरकारी केंद्राने दिलेला रिपोर्ट हा निव्वळ निष्काळजीपणाचा नमुना असल्याचे उघड झाले आहे.
प्रशासनाची भूमिका आणि आंदोलनाचा इशारा
प्रकरण गंभीर बनल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. “एकदा पॉझिटिव्ह झालेला रुग्ण पुन्हा निगेटिव्ह होऊ शकत नाही,” असे सांगत त्यांनी सरकारी अहवालात त्रुटी असण्याची शक्यता मान्य केली आहे. दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई आणि झालेल्या सामाजिक नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी पीडितेने केली आहे. न्याय न मिळाल्यास 1 मे रोजी मुख्यमंत्री कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पीडित कुटुंबाने दिला आहे.


