Kej Taluka Crime: बीड जिल्ह्यामध्ये माणुसकीला आणि रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. केज तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच चुलत चुलत्याने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रसंगामुळे हादरलेल्या आणि चुलतीने दिलेल्या धमकीमुळे खचलेल्या पीडितेने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ५ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. पीडित मुलगी गोठ्यातून घराकडे परतत असताना, तिच्या वडिलांच्या चुलत भावाने तिला वाटेत अडवले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या घटनेमुळे पीडित मुलगी प्रचंड मानसिक धक्क्यात होती.
चुलतीची संतापजनक भूमिका
नराधम चुलत्याने कृत्य केलेच, पण त्याच्या पत्नीने (पीडितेच्या चुलतीने) पीडितेला सावरण्याऐवजी उलट धमकावले. “ही घटना कोणाला सांगितली तर जीवे मारीन,” अशी धमकी चुलतीने दिल्यामुळे मुलगी अधिकच घाबरली. अत्याचार आणि त्यानंतर मिळालेली धमकी या दुहेरी संकटाने खचलेल्या मुलीने घरात असलेले विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
उपचारादरम्यान मृत्यू आणि पोलीस कारवाई
मुलीची प्रकृती बिघडल्यानंतर तिला तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. मात्र, मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि उपचार सुरू असतानाच तिचा अंत झाला. याप्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत मुख्य आरोपी असलेल्या नातेवाईकाला अटक केली आहे. केज न्यायालयाने आरोपीला १५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील दुसरा संशयित सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.


