Land Scam: छत्रपती संभाजीनगरमधील बहुचर्चित २३१ कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी आता कडक कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी हैदराबाद येथील मूळ मालकाला बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईमुळे शिवसेना खासदार संदिपान भुमरे यांचा चालक जावेद शेख याच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून, त्याच्यावरही लवकरच अटकेची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
हा संपूर्ण वाद एकाच जमिनीच्या दोन वेगवेगळ्या ‘हिबानामा’ (बक्षीसपत्र) दस्तऐवजांवरून सुरू झाला आहे. परभणीचे वकील मुजाहिद खान यांच्या तक्रारीनुसार, आरोपी मीर महेमुदअली बशारत अली खान याने एकाच जागेचे दोन स्वतंत्र लोकांना हिबानामा करून दिले. यातील एक हिबानामा खासदार संदिपान भुमरे यांचा चालक जावेद शेख याच्या नावावर करण्यात आला आहे. तब्बल २३१ कोटी रुपयांची ही जमीन हडपण्यासाठी हा बनाव केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
पहिली अटक आणि पोलिसांचा फास
शहर पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मीर महेमुदअली खान याला हैदराबाद येथून ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले आहे. आठ दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाल्यानंतर झालेली ही पहिली मोठी अटक आहे. आता पोलिसांचा मोर्चा दुसऱ्या आरोपीकडे म्हणजेच संदिपान भुमरे यांचा चालक जावेद शेख याच्याकडे वळला आहे.
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हा घोटाळा केवळ जमिनीपुरता मर्यादित नसून त्याला राजकीय किनारही लाभली आहे. संदिपान भुमरे हे सत्ताधारी पक्षाचे खासदार असताना आणि त्यांचे पुत्र आमदार असतानाही पोलीस प्रशासनाकडून थेट कारवाई होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शहरात सध्या या प्रकरणावरून ‘शिवसेना विरुद्ध भाजप’ असा सुप्त संघर्ष सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.


