Pune Crime: विद्येचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुणे शहरात संशोधक विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलल्याने शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पुण्यातील ‘बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया’मध्ये कार्यरत असलेल्या एका ३० वर्षीय विद्यार्थिनीने नैराश्यातून आपली जीवनयात्रा संपवली आहे. स्वतःच्या पीएचडी गाईडकडून वारंवार होणारा विनयभंग आणि मानसिक छळाला कंटाळून या तरुणीने शनिवारी (११ एप्रिल) चिंचवडमधील शाहूनगर येथील राहत्या घरी गळफास घेतला.
गाईड डॉ. बिन्नियमिनला पोलीस कोठडी; वडिलांनी केली तक्रार
या धक्कादायक प्रकरणी पीडित तरुणीच्या वडिलांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गांभीर्य ओळखून तातडीने कारवाई करत बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे सहाय्यक संचालक आणि विद्यार्थिनीचे गाईड डॉ. ए. बिन्नियमिन (वय ५०, रा. धानोरी) याला अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला १५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक भोजराज मिसाळ या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
सुसाईड नोटमधून भयाण वास्तव समोर; स्टॅम्प पेपरवर घेतला होता लिहून
आत्महत्येपूर्वी पीडित तरुणीने लिहिलेल्या चिठ्ठीतून तिच्यावरील अन्यायाचा पाढा वाचला गेला आहे. ऑगस्ट २०२५ पासून आरोपी प्राध्यापक तिच्याशी गैरवर्तन आणि अनैतिक प्रकार करत होता. संशोधनाच्या नावाखाली तिला सतत मानसिक जाच दिला जात होता. धक्कादायक बाब म्हणजे, आत्महत्येच्या दोन दिवसांपूर्वीच आरोपीने एका स्टॅम्प पेपरवर ‘पुन्हा अशी चूक होणार नाही’ असे लेखी लिहून दिले होते. मात्र, या सततच्या अपमानामुळे आणि छळामुळे तरुणीला इतका मानसिक धक्का बसला होता की तिने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.
कात्रज भागात दुसरी घटना: अंधश्रद्धेतून विवाहितेचा छळ
शहरातील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असतानाच कात्रज परिसरातही एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका ३३ वर्षीय विवाहितेचा अंधश्रद्धेच्या नावाखाली शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. या प्रकरणी पीडितेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, तिचा पती, एक वास्तू सल्लागार आणि ‘होलिस्टिक हीलर’ महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उच्चशिक्षित समाजातही अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.


