Aaditya Thackeray : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्ये मोठे संघटनात्मक बदल होण्याची शक्यता व्यक्त होत असून आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी देण्याबाबत चर्चा सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षाच्या आगामी बैठकीत यासंदर्भात प्रस्ताव मांडला जाऊ शकतो.
हे पद पूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी 2003 साली उद्धव ठाकरे यांच्यासाठी निर्माण केले होते. आता त्याच पदावर आदित्य ठाकरे यांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पक्षाच्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय जाहीर होऊ शकतो. संघटनात्मक बळकटी आणि आगामी निवडणुकांची तयारी लक्षात घेऊन आदित्य ठाकरे यांच्याकडे अधिक जबाबदारी सोपवली जाऊ शकते, असे संकेत मिळत आहेत.
सध्या युवासेना प्रमुख आणि पक्षनेते म्हणून काम पाहणाऱ्या आदित्य ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी निवड झाल्यास पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत त्यांचा थेट सहभाग वाढणार आहे. 2029 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तरुणांना आकर्षित करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो.
दरम्यान, पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा आदित्य ठाकरे यांना पाठिंबा असल्याचे समजते. गेल्या काही काळात त्यांनी राज्यभर दौरे करत शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण केला आहे. येत्या काही दिवसांत होणाऱ्या कार्यकारिणी बैठकीत या निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.


