Dinesh Lodhi : शिवपुरी जिल्ह्यात भाजप आमदाराच्या मुलाकडून भरधाव गाडी चालवत ५ जणांना धडक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात दिनेश लोधी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रीतम सिंग लोधी यांच्या मुलाने वेगाने येणाऱ्या एसयूव्हीने दुचाकीवरून जाणाऱ्या तीन मजुरांना आणि रस्त्याने चालणाऱ्या दोन महिलांना जोरदार धडक दिली. या अपघातात एकूण ५ जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, अपघातानंतर काही लोकांनी घटनेचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यांनाही धमकावल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या अपघातात संजय परिहार, आशिष परिहार, अंशुल परिहार, सीता वर्मा आणि पूजा सोनी हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला असून वाहनही जप्त करण्यात आले आहे.
दरम्यान, आमदार प्रीतम सिंग लोधी यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना, “कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही. आरोपी माझा मुलगा असला तरी त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी,” असे स्पष्ट केले आहे.


