मुंबई : बॉलिवूड सेलिब्रिटी आणि त्यांच्या अंगरक्षक अर्थात बॉडीगार्डची अनेकदा चर्चा सुरु असते. शाहरुख खान आणि सलमान खान यांचे अंगरक्षक अनेकदा चर्चेत असतात, कारण लोकांना वाटते की ते करोडो रुपये कमावतात. मात्र, शाहरुख खानसोबत काम केलेल्या यासीन खान या माजी सुरक्षा व्यावसायिकाने या दाव्यांमागील सत्य उघड केले आहे.
यासीन खान याने कमाईविषयी माहिती दिली. कोणताही अंगरक्षक २ किंवा २.५ कोटी रुपये कमावत नाही. बॉलिवूड स्टार्सच्या अंगरक्षकांना एक निश्चित मासिक पगार मिळतो, शिवाय प्रोजेक्ट किंवा असाइनमेंटनुसार काही अतिरिक्त पैसेही मिळतात. चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी अतिरिक्त पैसे मिळू शकतात, पण इंडस्ट्रीमध्ये हे सामान्य नाही. चित्रपटांच्या कामादरम्यान त्याने संरचित करारांची मागणी केली, ज्यामुळे इतर सुरक्षा कर्मचारी आणि निर्मात्यांमध्येही अशाच चर्चा सुरू झाल्या. पगाराव्यतिरिक्त काही फायदे असले तरी, सोशल मीडियावर पगाराबद्दल अनेकदा अतिशयोक्ती केली जाते.
सलमान खानचा शेरा आणि शाहरुख खानचा रवी सिंग यांसारख्या प्रसिद्ध अंगरक्षकांबद्दल बोलताना यासीन म्हणाला की, ते वार्षिक २-२.५ कोटी रुपये कमावत नाहीत. जर हे पैसे गृहित धरले तर महिन्याला १० लाख रुपये कोण देतं? असाही सवाल उपस्थित केला.


