Praniti Shinde: संसदेत १३१ वे घटनादुरुस्ती विधेयक फेटाळले गेल्यानंतर काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी या मुद्द्यावरून भाजपवर सडकून टीका केली. “हे विधेयक म्हणजे महिला सक्षमीकरणाचा प्रामाणिक प्रयत्न नसून, आरक्षणाच्या नावाखाली संविधानाची मोडतोड करण्याचा तो एक पद्धतशीर कट होता,” असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
“राजकीय फायद्यासाठी महिलांच्या भावनांचा वापर”
प्रणिती शिंदे यांनी सरकारच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना म्हटले की, जर सरकारकडे दोन-तृतीयांश बहुमत नाही याची स्पष्ट कल्पना होती, तर केवळ राजकीय नाटक करण्यासाठी हे विधेयक का आणले गेले? “मोदी-शाहांची यंदाची रणनीती पूर्णपणे फसली आहे. महिलांना अधिकार देण्याऐवजी विरोधकांना चक्रव्युहात अडकवून संविधानात छुपे बदल करण्याचा हा ‘स्क्रिप्टेड’ प्रकार होता,” अशी बोचरी टीका त्यांनी केली.
भाजपच्या विचारधारेवर प्रहार
भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) तोफ डागताना शिंदे यांनी विचारले की, “ज्या विचारधारेमध्ये महिलांना नेहमीच दुय्यम वागणूक दिली गेली, तेच लोक आज महिलांच्या हिताच्या गप्पा मारत आहेत. भाजपला देशाच्या अखंडतेपेक्षा केवळ निवडणुका महत्त्वाच्या वाटतात. मतदारसंघ पुनर्रचनेच्या माध्यमातून उत्तर आणि दक्षिण भारतामध्ये वितुष्ट निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचे काम सुरू आहे.” 2023 मध्ये जेव्हा आधीच महिला आरक्षण संमत झाले आहे, तेव्हा त्याची तातडीने अंमलबजावणी का केली जात नाही, असा सवालही त्यांनी केला.
“गुंडांचे राजकीय पुनर्वसन करण्याचा डाव”
प्रणिती शिंदे यांनी अत्यंत खळबळजनक आरोप करताना म्हटले की, मतदारसंघ पुनर्रचनेच्या तरतुदीचा वापर करून भाजप आपल्या पक्षातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नेत्यांना सुरक्षित जागा मिळवून देऊ पाहत आहे. “महिलांना 33 टक्के जागा देण्याचा केवळ दिखावा केला असून, प्रत्यक्षात आपल्या पक्षाच्या गुंडांचे हित जपण्याचा हा प्रकार आहे,” असा घणाघात त्यांनी केला.
राज्यातील महायुती सरकारवर टीका करताना त्या म्हणाल्या की, महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असताना सरकार मात्र केवळ राजकीय सोयीसाठी मतदारसंघांची फेररचना करण्यात मग्न आहे. महिला सुरक्षेपेक्षा सत्तेचे गणित जुळवणे हाच सरकारचा प्राधान्यक्रम बनला आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली. या वादामुळे राज्यातील राजकीय वातावरण आता अधिकच तापण्याची चिन्हे आहेत.


