Mumbai Local: मध्य रेल्वेची तांत्रिक बिघाडांची मालिका सुरूच असून, मंगळवारी दुपारी मुंबई सीएसएमटी आणि मस्जिद बंदर स्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणा कोलमडल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला. एकाच प्लॅटफॉर्मवर दोन लोकल समोरासमोर आल्याची धक्कादायक बाब समोर आली असून, यामुळे मोठी रेल्वे दुर्घटना थोडक्यात टळली आहे.
नेमका प्रकार काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सीएसएमटी स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर आधीच एक लोकल उभी होती. दरम्यान, बदलापूरहून येणारी जलद लोकल सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे त्याच ट्रॅकवर (प्लॅटफॉर्म ५) वळवण्यात आली. सुदैवाने, दोन्ही लोकल वेळेत थांबल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, या तांत्रिक गोंधळामुळे मस्जिद बंदरच्या अलीकडे जलद मार्गावरील लोकलच्या रांगा लागल्या होत्या.
प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवरून प्रवास
सकाळी कल्याण-ठाणे मार्गावर खोळंबा सहन केल्यानंतर, दुपारी पुन्हा एकदा सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांच्या संयमाचा अंत झाला. लोकल तासनतास एकाच जागी उभी राहिल्याने संतप्त नोकरदारांनी अखेर डब्यातून उतरून रेल्वे रुळावरूनच पुढचे स्टेशन गाठणे पसंत केले. ऐन उन्हाळ्यात लोकलमध्ये अडकून पडल्याने मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले.
रेल्वेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
गेल्या 24 तासांतील ही दुसरी मोठी घटना आहे. काल, 20 एप्रिल रोजी डोंबिवली स्थानकाजवळ लोकलचा डबा रुळावरून घसरल्याने वाहतूक ठप्प झाली होती. आज सकाळीही गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यातच दुपारी सिग्नल यंत्रणेत झालेल्या या ‘मेजर’ बिघाडामुळे मध्य रेल्वेच्या देखभाल-दुरुस्तीवर प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. सध्या तांत्रिक पथक सिग्नल यंत्रणा पूर्ववत करण्याचे प्रयत्न करत असून, सायंकाळच्या गर्दीच्या वेळीही याचा मोठा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे.


