Walmik Karad Gang: सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील संशयित आरोपी आणि कुख्यात वाल्मिक कराड टोळीची दहशत आता तुरुंगाच्या कोठडीतही कायम असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. बॅरॅकमध्ये बसण्याच्या साध्या कारणावरून या टोळीच्या गुंडांनी एका कैद्यावर जीवघेणा हल्ला चढवला. या घटनेनंतर पीडित कैद्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून, त्यात प्रशासकीय भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
किरकोळ वादातून अमानुष छळ
मिळालेल्या माहितीनुसार, कारागृहातील बॅरॅक क्रमांक ९ मध्ये ही घटना घडली. कराड टोळीचे सदस्य सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि त्यांच्या साथीदारांनी अझर अब्दुल रहमान पठाण या कैद्याला घेरून बेदम मारहाण केली. या हल्ल्यात पठाणच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून, तुरुंगात ही टोळी स्वतःचे कायदे चालवत असल्याचा आरोप होत आहे.
“जेल प्रशासनाने पैसे खाल्लेत…”; व्हायरल क्लिपमधील धक्कादायक दावे
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये पीडित कैद्याने अत्यंत गंभीर दावे केले आहेत.अझर अब्दुल रहमान पठाणने म्हटलं आहे की, मी तक्रार करायला गेलो असता जेलरने दुर्लक्ष केले. जेल प्रशासनाने कराड गँगकडून मोठी लाच घेतली असून ते गुंडांना पाठीशी घालत आहेत. तक्रार केल्यास दुसऱ्या तुरुंगात पाठवून तिथे कायमचा बंदोबस्त करण्याची धमकी मला दिली जात आहे. या क्लिपमध्ये केवळ मारहाणीचाच नाही, तर मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल प्रक्षोभक विधाने आणि वाल्मिक अण्णाकडे हिशोब चुकता करण्याचे संशयास्पद संदर्भ असल्याने खळबळ उडाली आहे.
तुरुंग प्रशासनाचा बचाव; चौकशीचे आदेश
या प्रकरणावर कारागृह अधीक्षक रामराजे चांदणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, मारहाणीची चर्चा ऐकल्यानंतर संबंधित कैद्याकडे विचारणा करण्यात आली होती, मात्र भीतीपोटी किंवा अन्य कारणामुळे त्याने अधिकृत तक्रार दिलेली नाही. तरीही, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


