Prajakt Tanpure: अजित पवार यांच्या निधनानंतर आज बारामतीसह राहुरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक पार पडत आहे. राहुरीतून अनपेक्षितपणे माघार घेतल्यामुळे चर्चेत आलेले शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अखेर आपल्या राजकीय भूमिकेबाबत मौन सोडले आहे. “मी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचाच निष्ठावान कार्यकर्ता असून भाजप प्रवेशाच्या सर्व चर्चा पूर्णपणे निराधार आहेत,” असे त्यांनी ठामपणे सांगितलं आहे.
तटस्थ भूमिकेचे स्पष्टीकरण
राहुरीच्या रिंगणातून माघार घेतल्यापासून तनपुरे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. तसेच, त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार न केल्यामुळे संभ्रम वाढला होता. यावर भाष्य करताना तनपुरे म्हणाले की, “ही पोटनिवडणूक राज्याच्या सत्तेचे समीकरण बदलणारी नसून केवळ स्थानिक प्रश्नांवर आधारित आहे. त्यामुळे मी माघार घेण्याचा निर्णय घेतला. मी कोणत्याही पक्षाच्या व्यासपीठावर गेलो नाही, याचा अर्थ चुकीचा काढला जाऊ नये.”
क्लीन चिट आणि निवडणुकीचा संबंध काय?
साखर कारखाना व्यवहारातील प्रकरणातून त्यांना मिळालेल्या दिलाशामुळेही चर्चांना उधाण आले होते. त्यावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, आर्थिक गुन्हे शाखेने वर्षभरापूर्वीच क्लोजर रिपोर्ट सादर केला होता आणि 3 महिन्यांपूर्वी न्यायालयाने तो स्वीकारला होता. काल आलेला निकाल आणि आजची निवडणूक हा केवळ एक योगायोग आहे. याचा माझ्या राजकीय निर्णयाशी कोणताही संबंध नाही.
दरम्यान,स्थानिक पातळीवर कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा, याचे स्वातंत्र्य आपण कार्यकर्त्यांना दिले असल्याचे त्यांनी नमूद केले. “कार्यकर्त्यांनी गावागावांतील प्रश्नांनुसार निर्णय घ्यावा असे मी सांगितले आहे. मी आजही आणि भविष्यातही आदरणीय शरद पवार साहेबांच्याच विचारांसोबत राहणार आहे,” असा विश्वास यावेळी तनपुरे यांनी व्यक्त केला.


