Bageshwar Baba : वादग्रस्त विधानांमुळे सतत चर्चेत राहणारे धीरेंद्र कृष्ण शास्त्री (बागेश्वर बाबा) यांनी नागपूरमधील भाषणात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
नागपूरच्या जामठा परिसरात उभारण्यात येणाऱ्या ‘भारतदुर्गा मंदिरा’च्या शिलान्यास कार्यक्रमात बोलताना त्यांनी दावा केला की, “छत्रपती शिवाजी महाराज अनेक युद्धांमुळे थकले होते आणि त्यांनी आपले राज्य समर्थ रामदास स्वामींच्या चरणी अर्पण करण्याची इच्छा व्यक्त केली.”
या विधानामुळे ऐतिहासिक संदर्भांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, यावर तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या कार्यक्रमाला मोहन भागवत, देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, शास्त्री यांच्या आणखी एका वक्तव्यामुळेही चर्चा रंगली आहे. “हिंदूंनी चार मुलांना जन्म द्यावा आणि त्यातील एक मूल राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी समर्पित करावे,” असा सल्ला त्यांनी दिला. देशात लोकसंख्या नियंत्रणावरून सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर या वक्तव्यावरूनही प्रश्न उपस्थित होत आहेत.
एकीकडे ऐतिहासिक दाव्यांवरून वाद निर्माण झाला असताना, दुसरीकडे सामाजिक आणि राजकीय स्तरावरही या विधानांचे परिणाम काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


