Sasvad News : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे ‘वाडा ॲग्रो मशरूम’ कंपनीत रविवारी दुपारी एक भीषण दुर्घटना घडली. सांडपाण्याच्या ड्रेनेज टाकीची स्वच्छता करताना विषारी वायूच्या संपर्कात आल्याने तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मृत कामगारांची ओळख पिंटू राजेश प्रसाद (वय २३), व्यास सोहम कुमार (वय २२) आणि गौतम रामसूरन कुशवाहा (वय ३६) अशी असून तिघेही उत्तरप्रदेश येथील असल्याची माहिती आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सर्वप्रथम एक कामगार टाकीत उतरला. मात्र तो बराच वेळ बाहेर न आल्याने दुसरा कामगार त्याला पाहण्यासाठी खाली उतरला. त्यानंतर तिसरा कामगारही मदतीसाठी टाकीत गेला. दुर्दैवाने, टाकीत साचलेल्या विषारी वायूमुळे तिघेही काही क्षणांत बेशुद्ध पडले आणि त्यांचा गुदमरून मृत्यू झाला.
बराच वेळ कोणीच बाहेर न आल्याने स्थानिक नागरिकांना संशय आला. त्यांनी तातडीने जेसीबीच्या सहाय्याने ड्रेनेज टाकीवरील सिमेंट स्लॅब फोडून तिघांना बाहेर काढले. त्यांना तातडीने जेजुरी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
या घटनेनंतर औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अशा धोकादायक कामासाठी आवश्यक सुरक्षा साधने, ऑक्सिजन उपकरणे किंवा प्रशिक्षण कामगारांना देण्यात आले होते का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून शवविच्छेदन प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणात कोणाचा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


