Bacchu Kadu And Eknath Shinde : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्या अलीकडील भेटीनंतर प्रहार जनशक्ती पक्षाच्या शिवसेनेत विलिनीकरणाची चर्चा रंगली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, विधान परिषद उमेदवारी देण्यापूर्वी शिवसेनेकडून प्रहार पक्ष विलीन करण्याची अट घालण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
विधान परिषदेसाठी नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांची नावे आघाडीवर असली तरी शिंदे गटातील काही नेत्यांनी या उमेदवारीला विरोध दर्शवला आहे. नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची मागणीही पुढे येत आहे. बच्चू कडू यांचा शिवसेनेशी थेट संबंध नसल्याचा मुद्दा उपस्थित करत पक्षांतर्गत मतभेद वाढले आहेत.
दरम्यान, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कडू यांची पुढील राजकीय भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार असून, महायुतीला 9 जागा जिंकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे-कडू समीकरण आणि संभाव्य विलिनीकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


