Iran Attack on Ship: पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर, ओमानच्या शिनास बाह्य बंदराजवळ इराणच्या तटरक्षक दलाने एका रासायनिक टँकरला लक्ष्य केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ‘एमटी चिरॉन’ नावाच्या या जहाजावर १२ भारतीय खलाशी तैनात होते. या हल्ल्यानंतर भारतीय जहाज वाहतूक मंत्रालयाने तातडीने निवेदन प्रसिद्ध करून सर्व भारतीय कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती दिली आहे.
नेमका प्रकार काय?
मिळालेल्या माहितीनुसार, टोगो देशाचा ध्वज असलेले हे जहाज इतर जहाजांच्या ताफ्यासोबत प्रवास करत होते. पर्शियन आखातातील ओमानजवळ हे जहाज पोहोचले असता, इराणी तटरक्षक दलाने त्याला अडवले. इशारा देण्यासाठी इराणकडून जहाजाच्या दिशेने गोळीबार करण्यात आला, ज्यामुळे काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मंत्रालयाचे स्पष्टीकरण आणि देखरेख
भारतीय नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाने या प्रकरणावर लक्ष केंद्रित केले आहे. मंत्रालयाचे संचालक श्री. मनदीप सिंग रंधावा यांनी या घडामोडींची अधिकृत माहिती दिली. ते म्हणाले, “पर्शियन आखातातील परिस्थितीवर आमचे बारकाईने लक्ष आहे. ‘एमटी चिरॉन’ वरील १२ भारतीयांसह या भागातील सर्व भारतीय जहाजे आणि त्यांचे कर्मचारी पूर्णपणे सुरक्षित आहेत. कोणालाही इजा झालेली नाही.”


