Pune News : मुंबईहून सोलापूरकडे धावणाऱ्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ (गाडी क्र. २२२२५) चा एक डबा सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक तीनवर प्रवेश करताना रुळावरून घसरला. या घटनेमुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. जवळपास सात तासांच्या प्रयत्नांनंतर मध्यरात्री दोनच्या सुमारास घसरलेला डबा यार्डात हलवण्यात आला आणि सेवा हळूहळू पूर्ववत करण्यात आली.
या अपघातामुळे अनेक गाड्या उशिरा धावल्या, तर काही रद्द करण्यात आल्या. त्यामुळे स्थानकावर प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. वेळेवर सूचना न मिळाल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण होते. उकाड्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली.
प्राथमिक माहितीनुसार, ‘सी १५’ या डब्याची पुढील चाके डायमंड क्रॉसिंगवर घसरली. ही अशी रचना असते जिथे दोन रेल्वेमार्ग एकमेकांना काटकोनात छेदतात. सध्या पुणे स्थानकावर यार्ड रिमॉडेलिंग आणि क्रॉसिंग अपग्रेडचे काम सुरू असल्याने त्याचा परिणाम झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, स्वयंचलित दरवाजे बंद झाल्यामुळे काही काळ प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. गाडी मार्गावर आणण्यासाठी वेळ लागणार असल्याने प्रवाशांना पर्यायी गाड्यांनी सोलापूरकडे रवाना करण्यात आले.
या घटनेमुळे प्रगती, डेक्कन, सिंहगड आणि महालक्ष्मी एक्स्प्रेससह अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बिघाड झाला. तसेच मंगळवारी सोलापूरहून मुंबईकडे जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.


