Maharashtra Weather : राज्यात वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले असतानाच आता अवकाळी पावसाचे संकट पुन्हा डोके वर काढत आहे. हवामान विभागाने पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. ऐन उन्हाळ्यात निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे वातावरणात अचानक बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्याचा विस्तार झाल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, हवामानातील या बदलामुळे शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः वादळी वाऱ्यांमुळे झाडे पडणे किंवा वीजपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


