Maharashtra Industry : पश्चिम आशियातील तणाव आणि इराण-अमेरिका संघर्षाचा परिणाम आता राज्यातील उद्योगांवर स्पष्टपणे दिसू लागला आहे. गॅस, काच आणि पेट्रोकेमिकल कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे महाराष्ट्रातील लघू आणि मध्यम उद्योग गंभीर संकटात सापडले आहेत. परिस्थिती पुढील तीन महिन्यांत सुधारली नाही, तर सुमारे ४० हजार कंपन्यांना टाळे लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पुणे, ठाणे, नवी मुंबई आणि वाशी परिसरातील उद्योगांवर याचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. कच्चा माल वेळेवर मिळत नसल्याने अनेक कारखान्यांचे उत्पादन ठप्प झाले असून, काहींनी उत्पादनात कपात केली आहे.
विशेषतः पेट्रोकेमिकलवर अवलंबून असलेल्या उद्योगांना मोठा फटका बसत आहे. भारतातील सुमारे ४० टक्के उद्योग या क्षेत्रावर अवलंबून आहेत. फार्मा उद्योगासाठी आवश्यक काचेच्या बाटल्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे, तर प्लॅस्टिक उत्पादनासाठी लागणाऱ्या रेझिनच्या कमतरतेमुळे उत्पादनावर परिणाम होत आहे.
कच्च्या मालाच्या किमती वाढल्या असल्या तरी तयार मालाला अपेक्षित दर मिळत नसल्याने उद्योजक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. परिणामी काही उद्योगांनी कामगार कपात सुरू केली असून, उत्पादन घटल्यामुळे जीएसटी संकलनावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्र इंडस्ट्री डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे यांनी इशारा देताना सांगितले की, पश्चिम आशियातील युद्धामुळे आवश्यक कच्च्या मालाचा तुटवडा आणि वाढती महागाई यामुळे लघु उद्योग अडचणीत आले आहेत. सरकारने तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर मोठ्या प्रमाणावर उद्योग बंद होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.


