Govind Pansare : ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून सुरू झालेला वाद पुन्हा चिघळला असून, संजय गायकवाड यांनी दिवंगत लेखक गोविंद पानसरे यांच्याविरोधात मरणोत्तर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत अंबी यांच्यावर कारवाई करून अटक करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. या भूमिकेमुळे राज्यात नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे.
बुलढाणा जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात गायकवाड यांनी पुस्तकातील आशयावर आक्षेप घेत विविध मुद्दे उपस्थित केले आहेत. पुस्तकाला परदेशातून आर्थिक मदत मिळाली का, याची चौकशी करावी, तसेच पुस्तक छापणारे आणि विक्री करणाऱ्यांवरही गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. काही पदाधिकाऱ्यांनी या पुस्तकावर बंदी घालण्याचीही मागणी केली आहे.
दरम्यान, प्रकाशक प्रशांत अंबी यांना दूरध्वनीवरून धमकी दिल्याच्या आरोपावरून गायकवाडांविरोधात कोल्हापूरमध्ये तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी विधीतज्ज्ञांचे मत मागवले आहे.
या प्रकरणात आणखी एक वळण म्हणजे, गायकवाड आणि अंबी यांच्यातील संभाषणाची ध्वनिफित व्हायरल झाली आहे. या ऑडिओमध्ये धमकीसदृश भाषा आणि कुटुंबीयांबाबत वादग्रस्त विधानं असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर अंबी यांना सतत धमकीचे फोन येत असल्याचेही समोर आले आहे.
अंबी यांचे वकील असीम सरोदे यांनी तक्रारीत गंभीर बाबींचा उल्लेख करत सरकार आणि प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. या सर्व घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.


