Hemant Sawara : महाराष्ट्रात पुन्हा एकदा खासदाराच्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. पालघरचे भाजप खासदार डॉ. हेमंत विष्णू सावरा यांच्या कारला शुक्रवारी सकाळी घोडबंदर रोडवर भीषण अपघात झाला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खासदार सावरा यांची कार मुंबईहून गुजरातकडे जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव डंपरने जोरदार धडक दिली. या धडकेत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने, डॉ. सावरा हे या अपघातातून थोडक्यात बचावले असून त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.
मात्र, या अपघातात कारचालकाला किरकोळ दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर नायगाव पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या कारलाही अपघात झाला होता. त्यांच्या वाहनाला दुचाकीस्वाराने पाठीमागून धडक दिल्याने गाडीचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर सलग घडणाऱ्या अशा अपघातांमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.


