Ashok Kharat Fraud : भोंदू कॅप्टन अशोक खरात प्रकरणात एसआयटीच्या चौकशीत धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. खरातचा गवगवा करणाऱ्या अनेकांना आता त्याची मोठी किंमत मोजावी लागत असून, राजकीय नेत्यांसोबतच काही नामांकित बिल्डरही त्याच्या जाळ्यात अडकले असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाला अशोक खरातने तब्बल पाच वर्षे फसवल्याचा आरोप आहे. या काळात संबंधित बिल्डरकडून खरातने चक्क मर्सिडीज कार भेट म्हणून घेतली, इतकेच नव्हे तर दबाव टाकून ती स्वतःच्या नावावर करून घेतल्याची माहिती समोर आली आहे.
एसआयटीच्या प्राथमिक तपासानुसार, खरातने या बिल्डरकडून चार ते पाच कोटी रुपयांची उकळपट्टी केली. ही रक्कम स्वेच्छेने दिली गेली की दबावाखाली खंडणीच्या स्वरूपात वसूल करण्यात आली, याचा तपास सध्या सुरू आहे. पोलिसांनी न्यायालयात खरात बिल्डरकडून खंडणी वसूल करत असल्याचा दावा केला आहे.
तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. संबंधित बिल्डरसोबत खरातने सलग पाच वर्षे विविध देशांचे परदेश दौरे केले. या दौऱ्यांदरम्यान व्यवसायात भरभराट होण्यासाठी जादूटोणा आणि तंत्रमंत्राच्या नावाखाली त्याने बिल्डरची फसवणूक केल्याची तक्रार आहे. या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उकळपट्टी झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, अशोक खरातविरोधात नाशिकमध्ये एकूण नऊ गुन्हे दाखल असून विविध टप्प्यांवर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या सर्व प्रकरणांतील तपासाची मुदत संपत आल्याने उद्या न्यायालयात पोलिसांची पुढील भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


