Delhi Fire : दिल्लीतील शाहदरा परिसरातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. विवेक विहार भागातील एका निवासी इमारतीत रविवारी पहाटे एसीच्या स्फोटामुळे भीषण आग लागली. या दुर्घटनेत तब्बल ९ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विवेक विहारमधील बी-१३ निवासी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. सुरुवातीला एसीचा स्फोट झाल्यानंतर काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण इमारतीला विळखा घातला. स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिक घाबरून घराबाहेर धावले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १४ गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. तब्बल अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सकाळी ६.२५ वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते.
या भीषण दुर्घटनेत ९ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून चार ते सहा जण गंभीररित्या भाजले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
अग्निशमन दल आणि पोलिसांनी संयुक्त बचावमोहीम राबवत १४ ते २० जणांना सुरक्षित बाहेर काढले. सुरुवातीला काही नागरिक इमारतीत अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी सध्या आत कोणीही अडकल्याचे वृत्त फेटाळले आहे.
या घटनेनंतर दिल्लीत पुन्हा एकदा अग्निसुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. काही दिवसांपूर्वीही राजधानीत अशाच प्रकारची आग लागण्याची घटना घडली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


