Rohit Pawar: तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या धक्कादायक निकालांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी भाजपला खडे बोल सुनावले आहेत. “भाजपने सत्तेच्या उन्मादात लोकशाहीचा गळा घोटू नये,” असे म्हणत त्यांनी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
विजयासाठी ‘SIR’ चा वापर केल्याचा गंभीर आरोप
रोहित पवार यांनी या विजयामागील ‘इनसाईड स्टोरी’ सांगताना भाजपच्या रणनीतीवर निशाणा साधला. ते म्हणाले, “गृहमंत्री अमित शाह यांनी १५ दिवस बंगालमध्ये तळ ठोकून यंत्रणा राबवली. SIR च्या नावाखाली तब्बल ९० लाख मतदारांना यादीतून बाहेर काढले गेले. ही लोकशाहीची हत्या असून अशा प्रकारे मतदारांना डावलून विजयाचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे.”
महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी ‘अँटी-इन्कमबन्सी’ लक्षात ठेवावी
बंगालच्या निकालाने हुरळून गेलेल्या महाराष्ट्रातील नेत्यांना पवारांनी वास्तवाची जाणीव करून दिली आहे. “ज्या ‘अँटी-इन्कमबन्सी’चा (सत्तेविरोधी लाट) फटका तामिळनाडू आणि बंगालमध्ये बसला, तशीच लाट आज महाराष्ट्र आणि केंद्रातही आहे. जर आज निवडणुका झाल्या, तर जनता या सत्ताधाऱ्यांनाही सत्तेबाहेर फेकल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
निकाल आधीच तोडफोड
निवडणुकीचे अंतिम निकाल स्पष्ट होण्यापूर्वीच बंगालमध्ये सुरू झालेल्या हिंसाचाराचा रोहित पवारांनी तीव्र निषेध केला. “भाजप कार्यकर्त्यांनी निकाल पूर्ण लागण्याआधीच तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयांवर हल्ले आणि तोडफोड सुरू केली आहे. हे भाजपच्या भविष्यातील ‘दहशतीच्या’ कारभाराचे संकेत आहेत का? जनतेला आता पुढे काय काय भोगावे लागेल याची धास्ती वाटते,” असे ते म्हणाले.
तमिळनाडूमध्ये INDIA आघाडीतील DMK तर प. बंगालमध्ये TMC ची सत्ता येईल, अशी अपेक्षा होती, पण या दोन्ही राज्यांना anti incumbency चा फटका बसल्याचं दिसतंय. त्यातच गृहमंत्री अमित शाह साहेब यांनी निवडणुकीसाठी प. बंगालमध्ये १५ दिवस ठाण मांडलं होतं आणि SIR च्या माध्यमातून ९० लाख मतदारांना… pic.twitter.com/0kWhZ7U0LG
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 4, 2026
लोकशाही संकटात!
सत्तेच्या जोरावर विरोधकांवर हल्ले करणे आणि मतदारांना डावलणे ही घातक प्रवृत्ती असल्याचे पवारांनी नमूद केले. भाजपची ही ‘राजकीय संस्कृती’ देशाला हुकूमशाहीकडे घेऊन जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.


