Kalyan Murbad Accident: मुरबाड-माळशेजघाट महामार्गावरील वैशाखरे गावाजवळ आज दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. भरधाव वेगाने येणारी एसटी बस आणि स्कॉर्पिओ गाडी यांच्यात झालेल्या भीषण समोरासमोर धडकेत 4 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की स्कॉर्पिओ गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, अपघातातील अन्य 3 जखमींची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताचा थरार आणि घटनाक्रम
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य परिवहन मंडळाची (ST) बस मुरबाडकडून माळशेजच्या दिशेने जात होती. त्याच वेळी समोरून कल्याणच्या दिशेने जाणारी स्कॉर्पिओ गाडी वैशाखरे घाटात आली असता दोन्ही वाहनांची जोरात टक्कर झाली. घाटातील वळणावर वाहनांचा वेग जास्त असल्याने चालकांना नियंत्रण मिळवता आले नाही. स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले, परंतु गाडीचा चक्काचूर झाल्याने प्रवाशांना बाहेर काढताना मोठी कसरत करावी लागली.
मृत्यूचा सापळा बनलेला महामार्ग
कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर हा नवीन रस्ता आता प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा ठरू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून या मार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. साधारण 20 दिवसांपूर्वी याच मार्गावरील रायते पुलावर झालेल्या भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे, ज्या दिवशी रायते पुलाचा अपघात झाला, त्याच दिवशी मुरबाडजवळ एका रिक्षाच्या अपघातात 2 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. या वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
अतिवेग आणि अवैध वाहतूक ठरतेय जीवघेणी
या महामार्गावरील अपघातांच्या मालिकेमागे अतिवेग आणि नियमांचे उल्लंघन ही प्रमुख कारणे असल्याचे समोर येत आहे. वेगमर्यादेचे नियम न पाळता वाहने चालवली जात असल्याने वळणांवर अपघात होत आहेत. तसेच, कल्याण स्टेशन परिसरातून मुरबाड, मानपाडा, मलंगड रोड आणि पडघा या भागांत धावणाऱ्या काळी-पिवळी आणि इको टॅक्सीमध्ये आजही क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची जीवघेणी वाहतूक सुरू असल्याचे विदारक चित्र आहे. स्थानिक प्रशासनाने आणि आरटीओ विभागाने यावर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता नागरिक करत आहेत.


