फोन वापरताना काळजी घ्यावी लागते नाहीतर फोनचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यात फोन पाण्यात पडला की काय करावं काय नको हे अनेकांना समजत नाही. मात्र, ओला फोन तांदळात ठेवल्याने तो सुकतो, असे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. असे म्हटले जाते की तांदूळ फोनमधील ओलावा शोषून घेतो, ज्यामुळे फोन खराब होण्यापासून वाचतो. मात्र, हे खरं नाही.
ओला फोन तांदळात ठेवल्याने तो सुकतो, हा एक गैरसमज आहे. ओला फोन तांदळात ठेवल्याने तो खराब होण्याची शक्यता वाढते. तांदळात ठेवल्यामुळे लहान कण आत जाऊन फोनचे इतर भाग बंद पडू शकतात. त्यामुळे, ओला फोन सुकवण्यासाठी तांदळाचा वापर करू नये. जेव्हा फोन पाण्यात पडतो किंवा त्यावर काही सांडते, तेव्हा अनेक लोक घाबरतात.
नुकसान टाळण्यासाठी, ते ऐकीव पण अनेकदा खोट्या ठरलेल्या पद्धतींचा अवलंब करतात. अनेक लोक त्यांच्या फोनमधील ओलावा काढण्यासाठी कॉटन स्वॅब वापरतात, तर काहीजण हेअर ड्रायरने फोन सुकवण्याची चूक करतात. या सर्व पद्धतींमुळे फोन खराब होऊ शकतो. फोन सुकवण्यासाठी कॉटन स्वॅब, तांदूळ आणि हेअर ड्रायर वापरू नयेत. फोन ओला झाल्यास वापरू नका आणि तो बंद करा. फोन एका कोरड्या, मऊ कापडाने स्वच्छ करा. फोन कव्हर, सिम कार्ड आणि मेमरी कार्ड यांसारख्या ॲक्सेसरीज काढून टाका. फोन जोरात हलवू नका आणि चार्जिंग पोर्ट पालथा ठेवा जेणेकरून पाणी निघून जाईल.
तसेच फोन पूर्णपणे सुकण्यासाठी सुरक्षित ठिकाणी ठेवा. फोनमधून पाणी काढण्यासाठी अल्कोहोल-आधारित द्रावण प्रभावी आहे. ते घटक स्वच्छ करते आणि गंजण्यापासून बचाव करते. तज्ञांच्या मते, ९०% आयसोप्रोपाइल अल्कोहोल द्रावणाचा वापर केल्यास गंजण्यामुळे होणारे फोनचे नुकसान टाळता येते. फोनची बॅटरी काढून टाका आणि टूथब्रशने हे द्रावण वापरा.


