Sangli Crime : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कोसारी येथील दुहेरी खून प्रकरणातील महत्त्वाच्या साक्षीदाराचे अपहरण करून त्याचा खून केल्याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन संशयितांना अटक केली आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्यांमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या युवा आघाडीच्या एका शहरप्रमुखाचाही समावेश असल्याने या प्रकरणाला राजकीय रंग चढला आहे.
मृत दादासो यमगर हे कोसारी येथील दुहेरी खून खटल्यातील महत्त्वाचे साक्षीदार होते. मंगळवारी न्यायालयात जबाब नोंदवण्यासाठी जात असताना संशयितांनी त्यांचे अपहरण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांना कर्नाटकातील अथणी तालुक्यातील मदभावी येथे नेऊन त्यांची हत्या करण्यात आली.
खुनानंतर हा प्रकार आत्महत्येसारखा भासावा यासाठी मृतदेह झाडाला लटकवण्यात आला होता. मात्र पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे प्रकरणाचा छडा लावत अवघ्या १४ तासांत आरोपींना अटक केली.
या प्रकरणाची पार्श्वभूमी डिसेंबर २०२३ मधील दुहेरी हत्याकांडाशी संबंधित आहे. शेतजमिनीच्या वादातून झालेल्या हाणामारीत दोन जणांचा मृत्यू झाला होता. त्याच खटल्यात दादासो यमगर हे महत्त्वाचे साक्षीदार होते. न्यायालयीन साक्षीपूर्वीच त्यांचे अपहरण आणि खून झाल्याने या प्रकरणाची गंभीरता आणखी वाढली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


