Maharashtra Weather : महाराष्ट्रात सध्या दुहेरी हवामानाचा अनुभव नागरिक घेत आहेत. एका बाजूला कोकणात कडाक्याचे ऊन आणि दमट उकाड्याने जनजीवन त्रस्त झाले आहे, तर दुसरीकडे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
आज (९ मे) विदर्भातील यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागांत जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
याशिवाय दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत उष्ण आणि दमट हवामान कायम राहणार आहे. वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला प्रशासनाने दिला आहे.
शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील अनेक भागांत तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढला. वाशीम आणि जळगाव येथे राज्यातील सर्वाधिक ४२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ब्रह्मपुरी, मालेगाव आणि भंडारा येथेही तापमान ४१ अंशांच्या पुढे गेले.
तर महाबळेश्वरमध्ये राज्यातील सर्वात कमी १८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हवामानातील या बदलामुळे पुढील काही दिवस नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.


