Indorikar Maharaj : प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कन्या ज्ञानेश्वरी यांच्या विवाहसोहळ्याची राज्यभर जोरदार चर्चा रंगली आहे. संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे ३ मे रोजी हा विवाह सोहळा अत्यंत शाही थाटामाटात पार पडला. या भव्य विवाहसोहळ्यासाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेमुळे आणि उपस्थित राहिलेल्या मान्यवरांमुळे हा सोहळा विशेष चर्चेचा विषय ठरला.
या विवाहासाठी तब्बल १० एकर क्षेत्रात भव्य मंडप उभारण्यात आला होता, तर सुमारे ३ लाख पाहुण्यांसाठी भोजन आणि बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. साखरपुड्यापासूनच या विवाहाची चर्चा सुरू होती आणि सोशल मीडियावर यावरून विविध प्रतिक्रिया उमटत होत्या.
या शाही सोहळ्याला राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री छगन भुजबळ, आमदार सत्यजित तांबे, विवेक कोल्हे यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावत नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले.
दरम्यान, “लोकांना साधेपणाचा सल्ला देणारे महाराज स्वतःच्या मुलीचं लग्न इतक्या मोठ्या थाटात का करत आहेत?” असा सवाल करत काही नेटकऱ्यांनी इंदोरीकर महाराजांना ट्रोल केले होते. यावर त्यांनी आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिलं.
इंदोरीकर महाराज म्हणाले, “लोक विचारतील एवढा खर्च कुठून आला, पण माझ्या भक्तमंडळाने जवळपास ९० टक्के खर्च उचलला आहे. देणगीदारांनी स्वेच्छेने मदत केली आहे. त्यामुळे कोणालाही ट्रोल करण्याचा अधिकार नाही.”
यासोबतच त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी आपल्या क्षमतेनुसार विवाहसोहळा करावा.”
या वक्तव्यानंतर इंदोरीकर महाराजांच्या भूमिकेची जोरदार चर्चा सुरू झाली असून, त्यांच्या मुलीच्या या शाही विवाहसोहळ्याची चर्चा पुढील काही दिवस राज्यभर रंगण्याची शक्यता आहे.


