Sunetra pawar : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना विजयानंतरचा जल्लोष टाळण्याचे भावनिक आवाहन सुनेत्रा पवार यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. आदरणीय अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी हा विजय त्यांच्या पवित्र स्मृतींना समर्पित केला.
सुनेत्रा पवार यांनी आपल्या संदेशात म्हटले की, बारामतीकरांनी दाखवलेला विश्वास हा त्यांच्यासाठी मोठी जबाबदारी आहे. मात्र हा आनंद व्यक्त करताना संयम पाळणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
त्या म्हणाल्या, “आजचा हा निकाल जाहीर होत असताना आदरणीय दादांच्या आठवणींनी आपण सर्व भावूक झालो आहोत. दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की, या विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये.”
तसेच, दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करण्याचे आवाहन करत त्यांनी सर्वांनी शांततेत आणि संयमाने हा क्षण स्वीकारावा, असे सांगितले.
बारामतीकरांचे आभार मानताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, “दादांच्या स्वप्नातील बारामती घडवण्याची संधी मला दिल्याबद्दल मी सर्व बारामतीकरांची मनःपूर्वक आभारी आहे. हा शेवट नाही, ही तर फक्त नव्या प्रवासाची सुरुवात आहे, निर्धाराची, संघर्षाची आणि नव्या बारामतीची.” सुनेत्रा पवार यांच्या या भावनिक आवाहनाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.


