West Bengal Election Result: गेल्या १५ वर्षांपासून पश्चिम बंगालमध्ये एकहाती सत्ता गाजवणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या साम्राज्याला भाजपने सुरुंग लावला आहे. संपूर्ण देश भाजपमय होत असतानाही आपला गड राखणाऱ्या ‘दीदीं’चा करिष्मा यंदा ओसरल्याचे चित्र असून, बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतराचे संकेत मिळत आहेत. सध्याच्या कलानुसार भाजप बहुमताचा आकडा पार करून ऐतिहासिक विजयाकडे कूच करत आहे.
आकडेवारी काय सांगते?
पश्चिम बंगाल विधानसभेच्या एकूण जागांपैकी बहुमतासाठी १४८ जागांची आवश्यकता आहे. ताज्या कलानुसार:
भाजप: १५७ जागांवर आघाडी
तृणमूल काँग्रेस (TMC): ११५ जागांवर आघाडी
या आकडेवारीमुळे बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपचे सरकार स्थापन होण्याचे मार्ग मोकळे झाले आहेत. २०१६ आणि २०२१ मध्ये पूर्ण ताकद लावूनही अपयश पदरी आलेल्या भाजपसाठी हा विजय अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जात आहे.
अमित शाहांचे ‘ब्रह्मवाक्य’ ठरले निर्णायक
या निवडणुकीची संपूर्ण धुरा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांनी बंगालमध्ये तळ ठोकून सूक्ष्म नियोजन केले होते. पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर अमित शाह यांनी भाजप १७० जागा जिंकेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला होता. मतमोजणीच्या कलानुसार शाहांचे ते भाकीत आता सत्यात उतरताना दिसत आहे.
विजयाची ‘ती’ दोन महत्त्वाची कारणे:
भाजपच्या या संभाव्य विजयामागे दोन तांत्रिक आणि धोरणात्मक बाबी अत्यंत प्रभावी ठरल्याचे बोलले जात आहे:
- १. कडक सुरक्षा व्यवस्था: निवडणुकांदरम्यान हिंसाचार रोखण्यासाठी तब्बल २ लाख सीआरपीएफ (CRPF) जवानांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
- २. मतदार यादीतील फेरबदल: निवडणूक आयोगाच्या ‘एसआयआर’ मोहिमेअंतर्गत सुमारे ९० लाख संशयास्पद मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली होती. हा बदल निकालात गेमचेंजर ठरल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
ममता बॅनर्जी यांनी भाजपला रोखण्यासाठी निकराची झुंज दिली, मात्र यंदा अमित शाहांच्या रणनीतीसमोर ‘दीदीं’चा गड टिकू शकला नाही. बंगालमधील हे सत्तांतर देशाच्या राजकारणाला नवी दिशा देणारे ठरणार आहे.


