Rohit Pawar: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी देशाचे लक्ष वेधून घेतले असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दांत प्रहार केला आहे. “महाराष्ट्रात जे छुप्या पद्धतीने करण्यात आले, तेच पश्चिम बंगालमध्ये अधिकृत (Official) रित्या राबवून लोकशाहीचा गळा घोटला जात आहे,” असा गंभीर आरोप रोहित पवारांनी केला आहे. सोमवारी सकाळी कराड येथे दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीतिसंगमावरील समाधी स्थळाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
९१ लाख मतदारांचा मुद्दा आणि संविधानाचे उल्लंघन
रोहित पवार यांनी पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त करताना म्हटले की, “संविधानाच्या विरोधात जाऊन पश्चिम बंगालमधील जवळपास ९१ लाख मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली. केवळ १५ टक्के मतदारांच्या जोरावर भाजप सत्ता बळकावण्याचा प्रयत्न करत आहे. इतकी प्रतिकूल परिस्थिती असतानाही ममता बॅनर्जी ज्या पद्धतीने लढा देत आहेत, ते कौतुकास्पद आहे. यावरूनच जनतेचा भाजपला असलेला विरोध स्पष्ट होतो.”
महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना सतर्कतेचा इशारा
बंगालमध्ये वापरण्यात आलेल्या ‘एसआयआर’ (SIR) मोहिमेचा संदर्भ देत पवारांनी महाराष्ट्रातील नेत्यांना सावध केले आहे. ते म्हणाले, “पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीने एसआयआरच्या माध्यमातून मतदारांची कपात करण्यात आली, तसाच प्रकार महाराष्ट्रात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आगामी काळात सर्वच राजकीय पक्षांनी ‘डोळ्यात तेल घालून’ सतर्क राहणे गरजेचे आहे.”
दक्षिणेतील निकालांचे स्वागत
केवळ बंगालच नव्हे तर तामिळनाडू आणि आसाममधील निकालांवरही त्यांनी भाष्य केले. तामिळनाडूमध्ये भाजपविरोधी पक्षांची आघाडी सरस ठरत असून, अभिनेते विजय यांच्या पक्षाला मिळणारा पाठिंबा हा बदलत्या राजकारणाचे संकेत असल्याचे त्यांनी नमूद केले. सध्याच्या कलानुसार बंगालमध्ये भाजप १४९ जागांसह बहुमताच्या जवळ दिसत असला, तरी रोहित पवारांच्या या विधानामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा राजकीय चर्चा रंगण्याची शक्यता आहे.


