Ashok Kharat Case : नाशिकमधील बहुचर्चित अशोक खरात प्रकरणात आज महत्त्वाची घडामोड घडत आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर आज विशेष तपास पथकासमोर (SIT) चौकशीसाठी हजर राहणार आहेत. यासाठी त्या सकाळी पुण्याहून नाशिककडे रवाना झाल्या असून त्यांच्या प्रवासादरम्यान झालेल्या काही हालचालींमुळे चर्चांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चौकशीसाठी जात असताना रुपाली चाकणकर यांनी वाटेत गाडी बदलली. तसेच पुणे ते नाशिक प्रवासादरम्यान त्यांनी ३ ते ४ वेळा गाडी थांबवल्याची माहिती समोर आली आहे. या हालचालींमुळे विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.
नाशिकच्या गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण महाविद्यालयात त्यांची चौकशी होणार असून एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते स्वतः त्यांची सखोल चौकशी करण्याची शक्यता आहे. या चौकशीवेळी रुपाली चाकणकर यांच्यासोबत महिला वकीलही उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षा असताना पदाचा गैरवापर केल्याचा ठपका रुपाली चाकणकर यांच्यावर ठेवण्यात आला आहे. अशोक खरातने स्थापन केलेल्या श्री शिवनिका संस्थेच्या विश्वस्त मंडळावर त्या सलग दोन वेळा सदस्य राहिल्या होत्या.
तसेच अशोक खरातचे सार्वजनिक कौतुक करतानाचे आणि त्याचे पाय धुतानाचे काही व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते. या वादानंतर त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
या प्रकरणात यापूर्वी त्यांच्या बहिणीचीही चौकशी झाली आहे. आता रुपाली चाकणकर यांच्या चौकशीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, अशोक खरातविरोधात दाखल असलेल्या महिला अत्याचाराच्या ८ आणि फसवणुकीच्या १ अशा एकूण ९ गुन्ह्यांप्रकरणी पुढील आठवड्यात दोषारोपपत्र दाखल होण्याची शक्यता आहे. तर फरार असलेल्या कल्पना खरातचा शोध घेण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. या प्रकरणातील पुढील चौकशीत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


