Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्यासह सोने-चांदी खरेदी टाळण्याचा आणि काटकसरीचा सल्ला दिल्यानंतर आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरून केंद्र सरकारला थेट प्रश्न विचारत मोठे आव्हान केले आहे.
पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, देशातील नागरिकांमध्ये सध्या अस्वस्थता आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत केवळ काटकसरीचे आवाहन करून चालणार नाही, तर केंद्र सरकारने देशाच्या आर्थिक आणि परराष्ट्र धोरणाबाबत स्पष्ट भूमिका मांडण्याची गरज आहे.
तसेच, नागरिकांना संयमाचा सल्ला देताना सरकारने स्वतःच्या खर्चांवरही नियंत्रण आणावे, अशी सूचनाही त्यांनी केली. वाढती महागाई, इंधन दर आणि जागतिक परिस्थितीमुळे सामान्य नागरिकांवर ताण वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी आखाती देशांमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना इंधन बचत, सार्वजनिक वाहतुकीचा वापर, ‘वर्क फ्रॉम होम’ आणि अनावश्यक खर्च टाळण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर महाराष्ट्र सरकारनेही इलेक्ट्रिक वाहनांचा वापर, ऑनलाइन बैठका आणि सरकारी दौऱ्यांवर निर्बंध यांसारखे निर्णय घेतले आहेत.


