Congress Leader : पुण्यात अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच सोमवारी रात्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभय छाजेड यांच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हा अपघात रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास पुण्यातील पिरंगुट घाट परिसरात घडला. अभय छाजेड हे आर्किटेक्चर कॉलेजमधून पुण्याकडे कारने परतत होते. यावेळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार थेट टेकडीवर जाऊन आदळली, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अपघातात अभय छाजेड यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत त्यांना रुग्णवाहिकेतून पुण्यातील पुना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांकडून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांच्या कंबरेखालील भागालाही दुखापत झाली असून प्रकृतीवर डॉक्टरांकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. अभय छाजेड हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस असून पुणे महापालिकेत पाच वेळा नगरसेवक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
दरम्यान, पुण्यातील भोर तालुक्यातील कापूरहोळ मार्गावरही आणखी एक भीषण अपघात घडला. खंडोबा माळ परिसरात भरधाव कार रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून कारचे मोठे नुकसान झाले आहे. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करत जखमीला रुग्णालयात दाखल केले.


