Bird Flu News : नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर परिसरात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. सहा पोल्ट्री फार्ममधील नमुने पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर ‘कलिंग ऑपरेशन’ सुरू केले आहे. आतापर्यंत तब्बल ३ लाख ८९ हजार कोंबड्या नष्ट करण्यात आल्या असून लाखो अंडीही नष्ट करण्यात आली आहेत.
प्रशासनाच्या माहितीनुसार, आतापर्यंत २१ लाख ६१ हजार अंडी आणि सुमारे ५० टन पक्षी खाद्य नष्ट करण्यात आले आहे. नवापूर तालुक्यातील ३५ पैकी १४ पोल्ट्री फार्ममध्ये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, उर्वरित पोल्ट्री फार्ममधील नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. पुढील अहवालांनुसार आणखी फार्ममध्ये कलिंग ऑपरेशन राबवण्याची शक्यता पशुसंवर्धन विभागाने व्यक्त केली आहे.
प्रशासनाकडून सतत परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून परिसरात सतर्कता वाढवण्यात आली आहे. बर्ड फ्लूमुळे पोल्ट्री व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असून नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेषतः नवापूर परिसरातील पोल्ट्री व्यवसायावर या संकटाचा मोठा परिणाम झाला असून पुढील काही दिवस परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


