Foreign Tours Cancelled: देशाची आर्थिक स्थिती भक्कम करण्यासाठी आणि परकीय चलन साठा टिकवून ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावश्यक खर्च टाळण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाची दखल घेत महाराष्ट्र सरकारने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील संपूर्ण मंत्रिमंडळ आणि सनदी अधिकाऱ्यांना त्यांचे नियोजित परदेश दौरे तात्काळ रद्द करण्याचे निर्देश दिले आहे. विशेष म्हणजे, ज्या दौऱ्यांचे नियोजन पूर्ण झाले होते आणि ज्यांना अधिकृत परवानगी मिळाली होती, अशा दौऱ्यांवरही आता कुऱ्हाड चालवण्यात आली आहे.
प्रशासकीय बदलांचे मुख्य पैलू
वैयक्तिक असो वा शासकीय, अभ्यासाच्या नावाखाली होणाऱ्या सर्व परदेश वाऱ्या आता थांबवण्यात आल्या आहेत. गरजेपेक्षा जास्त वाहने असलेल्या मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या कमी केल्या जातील. याची सर्व जबाबदारी सामान्य प्रशासन विभागाकडे (GAD) सोपवण्यात आली आहे. केवळ खर्च कपातच नव्हे, तर इंधन बचतीसाठी आता सरकारी ताफ्यात इलेक्ट्रिक वाहनांचा (EV) वापर वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.
मंत्री शंभूराज देसाईंचे कौतुक: कौटुंबिक सहलीचा त्याग
पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रत्यक्ष कृतीतून प्रतिसाद देताना राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. मागील तीन महिन्यांपासून नियोजित असलेला त्यांचा वैयक्तिक लंडन-पॅरिस दौरा त्यांनी ‘राष्ट्रहित’ लक्षात घेऊन रद्द केला. स्वतःच्या कुटुंबाचा आनंद बाजूला सारून ‘देश प्रथम’ ही भूमिका घेतल्याबद्दल राजकीय वर्तुळातून त्यांचे स्वागत होत आहे.
पंतप्रधानांचा ‘प्रो-अॅक्टिव्ह’ दृष्टिकोन
विशेष म्हणजे, जनतेला आवाहन करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी स्वतःच्या ताफ्यातील ५० टक्के गाड्या कमी करून बदलाची सुरुवात स्वतःपासून केली आहे. त्यांनी त्यांच्या ताफ्यातील ‘SPG’ पथकाला स्पष्ट आदेश दिले आहेत की, नवीन डिझेल किंवा पेट्रोल गाड्या न खरेदी करता इलेक्ट्रिक पर्यायांचा शोध घ्यावा.


