NEET Paper Leak Case: वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘NEET’ परीक्षेच्या पेपरफुटीने देशभरात खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणाच्या तपासात आता पोलिसांना मोठे यश मिळाले असून, मुख्य संशयित आरोपी धनंजय लोखंडे याला अटक करण्यात आली आहे. पुण्यातून पसार झालेला लोखंडे पोलिसांना सतत गुंगारा देत होता, मात्र तांत्रिक तपासाच्या मदतीने पोलिसांनी त्याला अहिल्यानगर जिल्ह्यातून शोधून काढले.
पोलिसांचा सापळा
पुण्यातून या गैरव्यवहाराचे पुरावे हाती लागताच पोलिसांनी धरपकड सुरू केली होती. कारवाईची कुणकुण लागताच धनंजय लोखंडे पुण्यातून फरार झाला होता. तो अहिल्यानगर परिसरात नाव बदलून किंवा लपून राहत असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई यशस्वी केली. या गुन्ह्यातील ही दुसरी मोठी अटक असून, यामुळे पेपरफुटीच्या रॅकेटचे अनेक ‘बुरखे’ फाटण्याची शक्यता आहे.
तपासाची व्याप्ती वाढणार; मुख्य सूत्रधार कोण?
लोखंडेच्या अटकेनंतर आता तपासाची सुत्रे वेगाने फिरणार आहेत. या रॅकेटचे जाळे केवळ पुण्यापुरते मर्यादित आहे की राज्याच्या इतर भागांतही पसरले आहे, याचा छडा पोलीस लावत आहेत. आतापर्यंत या प्रकरणात दोन प्रमुख व्यक्तींना अटक झाली आहे. या रॅकेटचा मुख्य मास्टरमाईंड कोण आहे आणि परीक्षार्थींना पेपर कसा पोहोचवला गेला, याची कसून चौकशी सुरू आहे. या अटकेमुळे आगामी काळात आणखी काही बडे मासे पोलिसांच्या जाळ्यात येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.


