IAS officers transfer : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा प्रशासनात मोठे फेरबदल केले आहेत. सामान्य प्रशासन विभागाने चार वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केल्याने मंत्रालयीन वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
नव्या आदेशानुसार डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या सचिवपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ते यापूर्वी पुणे विभागाचे विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत होते.
ग्रामीण विकासाशी थेट संबंधित आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या या खात्याची धुरा आता अनुभवी अधिकाऱ्याकडे दिल्याने आगामी काळात ग्रामविकास विभागात महत्त्वाच्या हालचाली होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कोणाची कुठे बदली?
डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार – ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे नवे सचिव
शीतल तेली-उगले – पुणे विभागीय आयुक्तपदी नियुक्ती
दीपक सिंगला – क्रीडा व युवक सेवा आयुक्तपदी नियुक्ती
मुरुगानंथम एम. – नागपूर महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी बदली
डॉ. पुलकुंडवार हे महाराष्ट्र केडरमधील अभ्यासू आणि अनुभवी अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी नाशिक महापालिका आयुक्त, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक तसेच साखर आयुक्त म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे.
विशेषतः साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्न हाताळताना त्यांनी प्रशासनात वेगळी छाप निर्माण केली होती. त्यामुळे आता ग्रामपंचायतींचे बळकटीकरण, जलयुक्त शिवार 2.0, ग्रामीण पाणीपुरवठा योजना आणि रोजगार निर्मिती कार्यक्रमांना गती मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


