Pune Accident News : पुण्याच्या मुळशी तालुक्यातील पौड परिसरात मध्यरात्री थरकाप उडवणारा भीषण अपघात झाला. पुणे-कोलाड महामार्गावर विठ्ठलवाडी फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या भाजीपाल्याने भरलेल्या पिकअप वाहनाला भरधाव लाल रंगाच्या कारने जोरदार धडक दिली.
या धडकेत कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून कारमधील 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक तरुणांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले आणि तातडीने रुग्णालयात दाखल केले.
अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे कारच्या पुढील बाजूस अधिकृत नंबर प्लेटऐवजी “ठाकूर” अशी पाटी लावलेली आढळून आली.
दरम्यान, अपघातावेळी कारमधील तरुण मद्यधुंद अवस्थेत होते का? तसेच कारचा वेग किती होता? याचा तपास पौड पोलीस करत आहेत. या घटनेनंतर भरधाव वाहनांवर कारवाईची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.


