Pune Crime : पुण्यातील रांजणगाव गणपती परिसरात पोलिस आणि फरार आरोपींमध्ये थरारक पाठलाग व कथित गोळीबाराची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. चऱ्होली गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांचे विशेष पथक शिरूर तालुक्यातील सोनेसांगवी परिसरात दाखल झाले होते. आरोपी शेळके वस्ती परिसरात लपल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला होता.
मात्र पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी दुचाकीवरून पलायन करण्याचा प्रयत्न केला. यानंतर अष्टविनायक रोडवरील गणपती चौक परिसरात काही काळ पोलिस आणि आरोपींमध्ये थरारक पाठलाग झाला. अखेर आरोपींची दुचाकी बंद पडल्याने त्यांनी वाहन सोडून उसाच्या शेतांचा व अंधाराचा फायदा घेत पळ काढल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, स्थानिकांच्या म्हणण्यानुसार आरोपींकडून हवेत गोळीबार करण्यात आल्याची चर्चा आहे. त्यानंतर पोलिसांनीही स्वसंरक्षणासाठी हवेत गोळीबार केल्याचे सांगितले जात असले तरी याबाबत पोलिस प्रशासनाकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
घटनेनंतर रांजणगाव एमआयडीसी पोलीस, पुणे ग्रामीण पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांची अतिरिक्त पथके घटनास्थळी दाखल झाली. परिसरात मोठ्या प्रमाणावर नाकाबंदी करण्यात आली असून उसाच्या शेतांमध्ये रात्रभर सर्च ऑपरेशन सुरू होते.
फरार आरोपींपैकी शेखर संभाजी जाधव याचे नाव चर्चेत असून त्याच्यावर पूर्वी गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.


