Pune Crime : पुण्यातील कोथरूड परिसरात कौटुंबिक वादातून वडिलांनीच आपल्या मुलावर ॲसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून तरुण जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुषार शाम कदम (वय 30) असे जखमी तरुणाचे नाव आहे. 14 मे रोजी घडलेल्या या घटनेत तुषार घरात झोपलेला असताना पैशांच्या कारणावरून त्याचा वडिलांशी वाद झाला. हा वाद इतका वाढला की संतापाच्या भरात वडिलांनी घरात स्वच्छतेसाठी वापरले जाणारे फिनेल त्याच्या चेहऱ्यावर फेकल्याचा आरोप आहे.
या हल्ल्यात तुषारच्या चेहऱ्यावर आणि डोळ्याला गंभीर इजा झाली असून त्याला तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्राथमिक तपास केला असून आरोपी वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत.
या घटनेमुळे कौटुंबिक वादातून वाढणाऱ्या हिंसाचाराचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला असून स्थानिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


