Pratap Sarnaik : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे राज्य परिवहन महामंडळावर आर्थिक ताण वाढत असून, एसटीच्या तिकीटदरात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत महत्त्वाचे वक्तव्य करत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे संकेत दिले आहेत.
डिझेल दरवाढीमुळे एसटीला कोट्यवधींचा फटका
माध्यमांशी बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, एसटी महामंडळाला दररोज सुमारे १० लाख ८७ हजार लिटर डिझेल लागते. इंडियन ऑईल कंपनीकडून पुरवठा होत असून मागील आठवड्यात डिझेलच्या दरात प्रतिलिटर ३ रुपयांची वाढ झाली आहे.
या वाढीमुळे एसटी महामंडळाला दररोज सुमारे ३३ लाख ७० हजार रुपयांचा अतिरिक्त भार सहन करावा लागत असून, वर्षभरात हा तोटा तब्बल १२४ कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
तिकीटदर वाढीवर १०-१२ दिवसांत निर्णय
सरनाईक म्हणाले की, “केंद्र आणि राज्य सरकारकडून काही विशेष सवलत किंवा मदत मिळाल्यास तिकीटदर वाढवणार नाही. मात्र इंधन दरवाढ कायम राहिली आणि मदत मिळाली नाही, तर एसटी तिकीटदर वाढवावे लागू शकतात.”
याबाबत मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार असून पुढील १० ते १२ दिवसांत अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
प्रवाशांना दिलेल्या सवलती कायम राहणार
तिकीटदर वाढ झाली तरी विद्यार्थ्यांसह विविध घटकांना दिलेल्या प्रवासी सवलती कायम राहतील, अशी ग्वाहीही प्रताप सरनाईक यांनी दिली.
अनधिकृत बाईक टॅक्सीवरही कारवाई
दरम्यान, बाईक टॅक्सी सेवांबाबत बोलताना त्यांनी काही कंपन्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचा आरोप केला. महिलांबरोबर गैरप्रकारांच्या घटनाही समोर आल्याचे सांगत सायबर पोलिसांना पत्र दिल्याची माहिती त्यांनी दिली.
अनधिकृत बाईक टॅक्सी सेवांवरच कारवाई केली जाईल, तर अधिकृत सेवांवर बंदी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


