Mahayuti Mahamandal Vatap: महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती सरकारमधील धुसफूस आणि नाराजी नाट्य संपवण्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या महामंडळांच्या अध्यक्ष आणि सदस्य पदांच्या वाटपाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रक्रियेत थेट हस्तक्षेप करत आगामी महिन्याभरात हे वाटप पूर्ण करण्याचे आदेश भाजप आणि मित्रपक्षांच्या कोअर कमिटीला दिले आहेत. फडणवीसांच्या या वेगवान हालचालींमुळे महायुतीमधील निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, ‘लाल दिव्याच्या’ प्रतीक्षेत असलेल्या इच्छुकांनी आतापासूनच मुंबईत मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
तीन पक्षांत सत्तेचे ‘असे’ होणार विभाजन
महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी महामंडळ वाटपाचा एक नवा आणि सर्वसमावेशक आराखडा तयार केला आहे. या अंतर्गत तिन्ही पक्षांना त्यांच्या ताकदीनुसार वाटा दिला जाईल:
भाजपचा (BJP) वरचष्मा: एकूण महामंडळांपैकी तब्बल 48 टक्के जागांवर एकट्या भाजपचा ताबा असेल.
शिवसेना (एकनाथ शिंदे गट): शिवसेनेला सन्मानजनक 29 टक्के जागांवर समाधान मानावे लागणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदरात 20 टक्के जागा पडतील.
हायव्होल्टेज बैठकीत नावांवर होणार शिक्कामोर्तब
महायुतीची आगामी बैठक या वाटपाच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक ठरणार आहे. या बैठकीत नेमक्या कोणत्या नेत्याला कुठल्या महामंडळाचे अध्यक्षपद द्यायचे, यावर सविस्तर खल होईल. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या महायुतीच्या 3 प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अंतिम यादीवर स्वाक्षरी केली जाईल. मंजुरी मिळताच अधिकृत नियुक्त्यांचे आदेश जारी केले जातील.
विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर थेट ‘लकी ड्रॉ’
सध्या राज्याचे राजकीय लक्ष विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एकूण 17 जागांवर (16 नियमित आणि 1 पोटनिवडणूक) लागून राहिले आहे. या निवडणुकीसाठी 18 जून रोजी मतदान पार पडणार असून 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे. जर राजकीय तडजोडी अंती ही निवडणूक बिनविरोध झाली, तर 18 जूनलाच यातील राजकीय अडथळा दूर होईल. या निवडणुकीची धामधूम संपताच महामंडळ वाटपाच्या फायलीवर तात्काळ स्वाक्षऱ्या केल्या जातील. त्यामुळे जून महिन्याच्या शेवटी राज्यातील कोणकोणत्या बड्या नेत्यांचे राजकीय पुनर्वसन होणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.


