School Reopen : विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यासह राज्यातील माध्यमिक शाळांचे नवीन शैक्षणिक वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून येत्या १५ जूनपासून नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे.
माध्यमिक शिक्षण विभागाने याबाबत अधिकृत परिपत्रक जारी करत सर्व मान्यताप्राप्त शाळांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार शाळांचे पहिले सत्र १५ जून २०२६ पासून सुरू होऊन ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत चालणार आहे.
दिवाळी सुट्टी कधी?
विद्यार्थ्यांना दिवाळी सणानिमित्त २ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर २०२६ दरम्यान सुट्टी देण्यात येणार आहे. दिवाळीनंतर शाळांचे दुसरे सत्र पुन्हा सुरू होईल.
दुसरे सत्र आणि उन्हाळी सुट्टी
दुसरे सत्र १५ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होऊन १ मे २०२७ पर्यंत चालणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. यानंतर विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली असून ३ मे २०२७ ते १४ जून २०२७ या कालावधीत शाळांना सुट्टी असेल.
शिक्षण विभागाच्या सूचना
नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शाळांनी स्वच्छता, सुरक्षितता आणि आवश्यक शैक्षणिक तयारी पूर्ण करण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विशेष उपक्रम राबवण्याच्याही सूचना शाळांना करण्यात आल्या आहेत.


