Farmers Loan Waiver: राज्यातील बळीराजासाठी दोन अत्यंत महत्त्वाच्या आणि दिलासादायक घडामोडी समोर आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानुसार, राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांची २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी येत्या ३० जूनपूर्वी पूर्ण केली जाईल, अशी स्पष्ट ग्वाही कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) महत्त्वाच्या बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या अंतर्गत त्यांनी शेती मशागतीच्या काळात भेडसावणाऱ्या डिझेल समस्येवर आणि राजकीय जागावाटपावर पक्षाची भूमिका मांडली.
पुण्याच्या जागेवर राष्ट्रवादीचाच दावा
पुणे जिल्ह्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीत जागावाटप आणि चाचपणीवर सविस्तर चर्चा झाली. “पुणे जिल्ह्यातील बहुतांश मतदारसंघ आणि ताकद सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याने, पुण्याच्या जागेवर आमचाच नैसर्गिक हक्क आहे,” असे भरणे यांनी ठामपणे सांगितले. या संदर्भात नेत्या सुनेत्रा पवार योग्य तो निर्णय घेतील आणि महायुतीचे सर्व ज्येष्ठ नेते एकत्र बसून अंतिम जागावाटपाचा तिढा सोडवतील, अशी माहिती त्यांनी दिली.
डिझेलसाठी सातबारा मागितल्यास पंपांचा परवाना धोक्यात!
सध्या मान्सूनपूर्व कामांसाठी मराठवाडा आणि विदर्भासह राज्यभरात डिझेल खरेदीसाठी शेतकऱ्यांची पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी होत आहे. अशातच, परभणीमध्ये डिझेल हवे असल्यास शेतकऱ्यांकडे चक्क सातबारा उताऱ्याची मागणी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या जाचक अटीची राज्य सरकारने तातडीने दखल घेतली आहे. कृषिमंत्र्यांनी या प्रकरणी थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून चौकशीचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांना डिझेल देण्यासाठी सातबारा उताऱ्याची सक्ती करणाऱ्या पेट्रोल पंपांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा कडक इशारा त्यांनी दिला आहे.
इंधनाचा तुटवडा नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका!
“राज्यात डिझेलचा कोणताही तुटवडा नाही. केवळ टंचाईच्या अफवांमुळे सध्या पंपांवर इंधनाचा खप २० टक्क्यांनी वाढला असून नागरिक घाबरून गर्दी करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी स्वतः राज्यात पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांना बळी पडून तासन्तास रांगेत उभे राहू नये, प्रत्येकाला वेळेत इंधन मिळेल,” असे आवाहन कृषिमंत्र्यांनी केले आहे.


